राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह 51 जणांविरूध्द FIR दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आज हायकोर्टाने अजित पवारांसह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली असून येत्या पाच दिवसांत हि प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक नेत्यांचा सहभाग असून यामध्ये मधुकर चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. यामध्ये पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात या बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी देखील अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले असून त्या प्रकरणात देखील त्यांच्यावर अटकेची तलवार असून या प्रकरणात हायकोर्टाच्या या आदेशाने त्यांच्या अडचणींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अशा प्रकारे झाला राज्य सहकारी बँक घोटाळा

१) बँकेच्या संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करून कर्जपुरवठा केला
२) त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचे कर्ज दिले
३) अनेक साखर कारखान्यांकडे २२५ कोटी रुपयांचे थकीत कर्ज
४) लघुउदयॊजकांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे ३ कोटींचे नुकसान
५) अनेक सूतगिरण्यांना जवळपास ६० कोटी रुपयांचे कर्ज
६) कर्जवसुलीमध्ये मालमत्ता विक्री करून देखील जवळपास ५०० कोटी रुपयांचे बँकेचे नुकसान
७) केन अॅग्रो इंडियामुळे १९ कोटींचा तोटा