विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी बातमी ! नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखेपासून राज्यभरातील शाळा सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. अनलॉकच्या ५ व्या टप्प्यात सर्वकाही सुरु होत असताना शाळा महाविद्यालये बंदच होती. ऑनलाइन पद्धतीने राज्यात शिक्षण सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी सुरु होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले असून, त्यासंदर्भातील एसओपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार आहे. कशा पद्धतीने शाळा सुरु करण्याचे नियोजन असेल त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा मे महिन्यातच होतील. तसेच शाळा सुरु करण्यापुर्वी पालकांची परवानगी घेण्यात येईल. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबद्दल नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आल्या. कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पण आता दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत सरकार विचारधीन आहे.