सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून शिवजयंती साजरी, बाल शाहिरांकडून ‘पोवाडा’ सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात दरवर्षी १९ फ्रेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ‘शिवाजी महाराज की जय’ असा आवाज दुमदुमतो. उद्या साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीच्या औचित्यावर मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेसमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. रेल्वेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करत प्रवाशांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. तसेच बाल शाहिरांकडून पोवाडा सादर करण्यात आला.

दरम्यान , सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवासी प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदाही रेल्वेत प्रवाशांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रेल्वेतील प्रवाशांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘मोडेल पण वाकणार नाय’ हा पोवाडा सादर करत बाल शाहिराने प्रवाशांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगितली. यावेळी रेल्वेतील संपूर्ण वातावरण शिवमय झाले.

You might also like