Coronavirus : ‘कोरोना’चा धोका वाढतोय ! राज्यात गेल्या 24 तासात 12822 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 17367 जणांचा मृत्यू तर बाधितांचा आकडा 5 लाखाच्या पुढं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 5 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात उच्चांकी 12 हजार 822 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 3 हजार 84 वर पोहचली आहे. राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राज्यात मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वेगाने वाढू लागले आहे. राज्यात आज दिवसभरात 275 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिवसभरात 11 हजार 081 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात 3 लाख 38 हजार 262 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 67.26 टक्के झाला आहे. तर रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19 टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात 275 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 367 इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 3.45 टक्के इतका आहे.

सध्या राज्यामध्ये 1 लाख 47 हजार 048 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. राज्यात 9 लाख 89 हजार 612 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 35 हजार 625 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 26 लाख 47 हजार 020 प्रयोशाळा चाचण्या घेण्यात आला आहे. त्यापैकी 5 लाख 3 हजार 84 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.