दिवाळीच्या तोंडावर युवक काँग्रेसची आदित्य ठाकरे यांच्याकडे ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची मागणी वाढणार आहे. आगामी काळात दिवाळीच्या ( Diwali) सणात फटाक्यांची मागणी वाढणार आहे. मात्र त्याआधी दिवाळीपूर्वी विविध राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ( Satyajit Tambe) यांनी पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackery) यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या काही घटकांचे नुकसान होणार असले तरी पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असे तांबे यांनी म्हटले आहे.

दिवाळी जवळ आल्याने सध्या फटक्यांवरील बंदीची चर्चा सुरू आहे. दरवर्षीची फटाक्यांवरील बंदीची अशीच चर्चा होते. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर ती जोरकसपणे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी थेट फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.तांबे यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल ( West Bengal) या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारांनी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. फटक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे.

विविध व्यापारी आणि नागरिक या व्यवसायावर अवलंबून आहेत, मात्र आपण पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे.दरम्यान, दरवर्षी कॉलेज आणि शाळांमध्ये सामाजिक संस्थांमार्फत फटाक्यांविरूद्ध प्रबोधन मोहीम राबविली जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. यावर्षी मात्र कोरोनाच्या या संकटामुळे या मागणीने अधिक धरली आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. फटाक्यांमुळे होणारा धूर आणि प्रदूषण हे सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे विविध राज्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.