पुण्यात धान्य विक्रेत्याची 19 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – होलसेल धान्य विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. चॅनेल इम्पेक्स कंपणीतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडून चनाडाळ आणि तूरडाळ घेऊन फसविले आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० कालावधीत घडला आहे.

महम्मंद युसूस सिद्धीकी (वय ५६, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चॅनेल इम्पेक्स आणि अगॉन लाईन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मंद धान्य विक्रीचे व्यवसायिक असून होलसेल ग्राहकांकडून ऑनलाईनरित्या ऑर्डर घेउन ते धान्याची विक्री करतात. ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० कालावधीत चॅनेल इम्पेक्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एकाने महम्मंद यांना इ-मेलवर तुरडाळ आणि चनाडाळीची ऑर्डर मागितली. त्यानुसार मोहम्मंद यांनी त्यांना २ लाख ७५ हजारांची चनाडाळ आणि १६ लाख ३४ हजारांची तूरडाळ पाठविली. त्यानंतर धान्य मालाची रक्कम दोन दिवसांत देण्याचे चॅनेल इम्पेक्स कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, धान्याची ऑर्डर स्वीकारुनही चार महिने १९ लाखांचे बील देण्याचे संबंधितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महम्मंद यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महादेव कुंभार अधिक तपास करीत आहेत.