मकरंद रानडे पिंपरी-चिंचवडचे पहिले अप्पर आयुक्‍त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य गृह विभागाने शुक्रवारी रात्री पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून पिंपरी-चिंचवडच्या अप्पर पोलिस आयुक्‍तपदी मकरंद रानडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून मकरंद रानडे यांची नियुक्‍ती झाल्याने निश्‍चितच पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय 15 ऑगस्ट पासुन सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ef3bb45-9215-11e8-b767-4d81ab9871d5′]

अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे हे सध्या ठाणे पोलिस आयुक्‍तालयात अप्पर आयुक्‍त (गुन्हे) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी पुण्यात पोलिस उपायुक्‍त म्हणून तर सोलापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्य बजाविलेले आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात अप्पर आयुक्‍तांची एकच जागा असून त्या जागी रानडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्‍तालयाचे विभाजन होवुन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती होत आहे. यापुर्वी पोलिस महासंचालक कार्यालयात तेथे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या नियुक्‍ती केल्या होत्या. आता राज्य गृह विभागाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात उपायुक्‍त आणि अप्पर पोलिस आयुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत. राज्य पोलिस दलातील 19 पोलिस उप महानिरीक्षकांच्या शुक्रवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात देखील उप महानिरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

मकरंद रानडे हे ठाणे पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत असताना त्यांच्याकडे गुन्हे शाखेची धुरा होती. ठाणे आयुक्‍तालयाच्या गुन्हे शाखेने अनेक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून अनेक चांगले गुन्हे उघडकीस आणले आहेत. अप्पर आयुक्‍तांच्या नेमणुकीनंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे आयुक्‍त कोण होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.