Coronavirus : रिपोर्ट निगेटिव्ह आला पण लक्षणं होती, हॉस्पीटलमध्ये ‘कोरोना’ रूग्णाची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याचा आणखी एक प्रकार मुंबईत घडला आहे. 43 वर्षीय रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या नायर रुग्णालयात घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रुग्ण हे माहिमला राहणारे होते. 31 मे पासून कोरोनाची लक्षण असल्यामुळे त्यांना नायर रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल निगेटिव्ह आला. पण त्यांना कोरोनाची लक्षणासारखी सर्दी आणि ताप असल्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. त्यानंतर दुसरी चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यात आली. दुसर्‍यांदा केलेल्या चाचणीचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मात्रा, संबंधित रुग्ण सकाळी बाथरुममध्ये गेले होते.

10 वाजता वॉर्डमधील एकाच्या लक्षात आले की बराच वेळ बाथरुमचा दरवाजा बंद आहे. त्यानंतर याची माहिती रुग्णालयातील अधिकार्‍यांना देण्यात आली. अधिकार्‍यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला असता, रुग्णाने टॉवेलने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे दिसून आले.