‘कोका-कोला अन् थम्स-अपवर बंदीची मागणी’ ! सुप्रीम कोर्टाकडून याचिकाकर्त्याला ‘दणका’, ठोठावला ‘एवढा’ दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोका कोला आणि थम्स-अप या शीतपेयांवर बंदी घालण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार्‍या व्यक्तीलाच सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला आहे. कोर्टाने याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

उम्मेदसिंह पी चावडा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात कोका कोला आणि थम्सअपच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली होती. हे दोन शीतपेय आरोग्यासाठी घातक असल्याने त्यावर बंदी घालावी आणि केंद्राला अधिसूचना जारी करण्याचे निर्देश द्यावे असे या याचिकेत म्हटले होते. न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्याला एका महिन्याच्या आत पाच लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे.

याचिकाकर्त्याने कायद्याच्या प्रक्रियेचा दुरूपयोग केल्याचे कोर्टाने म्हटले असून या विषयावर कोणतीही ठोस तांत्रिक माहिती नसताना ही याचिका दाखल करण्यात आल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. कोका-कोला आणि थम्स-अप आरोग्यासाठी घातक असल्याच्या दाव्याला बळकटी देण्यास याचिकाकर्ता असमर्थ आहे. शिवाय याच दोन ब्रँडवर का बंदी घालावी याबाबतही त्यांच्याकडे स्पष्टीकरण नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.