Mansukh Hiren Death Case : केंद्राचा ठाकरे सरकार अन् ATS ला दणका, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण तापत आहे. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावर केंद्र सरकारने विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. त्यानुसार आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला आहे. हा राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून केला जात होता. मात्र, आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल करावी, असेही आदेशात म्हटले आहे. गृह मंत्रालयाने याबद्दल नोटिफिकेशनही काढले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसकडून (ATS) एनआयएकडे देण्यात आला आहे.