डोक्यात फरशी मारुन पत्नीने केला पतीचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील नेरी येथे घडली. ही घटना आज (रविवार) पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पत्नीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मानसिक संतुलन बिघडल्याने तिने पतीचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

संदीप उत्तम पवार (वय २०, रा. नेरी, ता. जामनेर) असे मृत पतीचे नाव आहे. नेरी येथे उत्तम पवार यांची शेती आहे. घरातील सर्वजण शेती व हातमजूरीचे काम करतात. गेल्या दीड वर्षांपूर्वीच संदीप व कोमलचे लग्न झाले होते. ती सात महिन्याची गर्भवती आहे. गेल्या काही दिवसापासून तिचे मानसिक संतुलन बिघडले.

शुक्रवारी ती माहेरी मोहाडी येथे गेली होती. मात्र, ती लगेच शनिवारी परत आली. आज सकाळी पाच वाजता उठून जो तो आपआपली कामे करीत होता. कोमलनेही घराची झाडझूड केली. यानंतर ती बाहेर आली. या ठिकाणी एका घराचे काम सुरू आहे. येथून फरशी घेऊन थेट पती झोपलेला होता त्या रूममध्ये जाऊन तिने पतीच्या डोक्‍यात फरशी घातली. यात पती संदीप गंभीर जखमी झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा रस्त्याच मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले.