पुणे जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारपासून सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील बाजर समित्या येत्या सोमवारपासून सुरु करण्यात याव्यात असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा अजित पवार यांनी विधान भवन येथे एका बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी बाजार समित्या सुरु करण्याचे आदेश दिले.

या बैठकिला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, पोलीस आयुक्त. डॉ. के व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमावबंदी आयुक्त एस. एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कडवडे व अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच येत्या सोमवारपासून बाजार समित्या सुरु करण्यात याव्यात. आगामी काळात मान्सूनचे आगमन होणार आहे. कोरोनाचा सामना करताना मान्सून पूर्व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी त्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांना यावेळी केल्या.

पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्याने त्या ठिकाणी अटी-शर्तींच्या अधीन राहून उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्योग किंवा औद्योगिक आस्थापनांच्या प्रमुखांना कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्यांची निवास व्यवस्था, मास्कचा वापर याबाबत आवश्यक ते निर्देश देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.