तर काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करू : मायावती

लखनऊ : वृत्तसंस्था – दोन एप्रिल रोजी भारत बंददरम्यान निष्पाप व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे न घेतल्यास मध्य प्रदेश आणि राजस्थानातील काँग्रेस सरकारांना दिलेल्या बाहेरुन पाठिंब्याचा फेरविचार करावा लागेल असा इशाला बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेसला दिला आहे.

या भारत बंद दरम्यान, उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये तत्कालीन भाजप सरकारने निष्पाप व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय हेतूने तसेच जातीचा विचार करून हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. आता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून त्यांनी हे निष्पाप व्यक्तींवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा आम्हाला पाठिंब्याचा फेरविचार करावा लागेल, असे मायावती यांनी म्हटले आहे.

२३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत बसपचे दोन आमदार आहेत, तर २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत सहा आमदार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसकडे स्वबळावर बहुमत नसल्याने मायावती यांच्या बसपने काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे.