महापौरपद निवडणूक : काँग्रेसचे सर्वाधिकार विखेंना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापौर निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तटस्थ राहायचे की, शिवसेना अथवा
भाजपा बरोबर जायचे, याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या पाचही नगरसेवकांनी डॉ. सुजय विखे यांच्याकडे सर्वाधिकार सोपविले आहेत. आज रविवारी (दि.२३) विखे यांच्या उपस्थितीत त्यांच्या राहता तालुक्यातील लोणी येथील निवासस्थानी झालेल्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार, शहरप्रमुख दीप चव्हाण, फारुख शेख यांनी डॉ. सुजय विखे यांची लोणी येथे भेट घेऊन चर्चा केली. शिवसेना व भाजपाकडून सुरु असलेली मोर्चेबांधणी, संख्याबळ यावर चर्चा होऊन काँग्रेसने तटस्थ राहिल्यास काय परिस्थिती असेल, शिवसेना किंवा भाजप बरोबर गेल्यास काय होईल, काँग्रेसने पक्ष म्हणून काय भूमिका घ्यायला हवी, यासह पाचही नगरसेवकांचे काय म्हणणे आहे आदींवर बैठकीत चर्चा झाल्याचे समजले. सर्वांनी एकत्रित चर्चा करुन डॉ. सुजय विखे यांच्यावर निर्णय सोपविला आहे.

महापौर निवडणुकीसाठी आणखी चार-पाच दिवस असल्याने लवकरच निर्णय आमच्यापर्यंत येईल, असे सांगत काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडणुकीतील भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.

ऐनवेळी काँग्रेसची भूमिका
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल, याबाबत काँग्रेसने त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवून उत्सुकता वाढवली आहे. विखे यांच्याकडून ऐनवेळी निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकत्रितपणे घडवलेली आहे. यामुळे काँग्रेसची भूमिका राष्ट्रवादीच्या भूमिकेबरोबर असेल, अशी शक्यता आहे.