पत्रकारितेसाठी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सोडली खासदारकी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खरेतर राजकारणात येण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आला नाही. खेळाडू, सिनेसुष्टीतील व्यक्ती देखील राजकारणात आल्या आहेत. पण ओडिसाच्या एका नेत्याने चक्क राजकारण सोडून पत्रकारितेकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिसातील माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि विद्यमान खासदार तथागता सत्पथी (Tathagata Satpathy) यांनी चक्क राजकारण सोडून पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिसाचा सत्ताधारी पक्ष बीजदचे विद्यमान खासदार तथागता सत्पथी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेत मंगळवारी राजकारण सोडून पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्विट करीत की माहिती दिली आहे.

काय आहे सत्पथी यांचे ट्विट
तथागता सत्पथी यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘सध्या पत्रकारिता आणि न घाबरता काम करणाऱ्यांची आवश्यकता आहे. पत्रकारितेवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी मी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इतकी वर्ष मला सांभाळून घेतल्याबद्दल आमचे सहयोगी नेते नवीन पटनायक यांचा मी आभारी आहे. मला आता कळून चुकले आहे की लोकांची सेवा करण्यासाठी फक्त राजकारण हाच पर्याय नाही.’ तसेच अन्य एका ट्वीटमध्ये तथागता यांनी आपल्या मतदारांचेही आभार मानले. तसेच तरुण नेतृत्वाला जास्तीत जास्त संधी देण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

विशेष म्हणजे तथागता सत्पथी हे चार वेळा खासदार पदावर निवडून आले आहेत. ते प्रख्यात लेखिका आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे पुत्र आहेत. तथागता सत्पथी यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सत्पथी यांची आई नंदिनी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असताना १४ जून १९७२ ते १६ डिसेंबर १९७६ या काळात ओडिसाचे मुख्यामंत्रीपद भूषवले होते. ४ऑगस्ट २००६ रोजी भुवनेश्वर येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना सुपर्णो सत्पथी, तथागत सत्पथी ही दोन आपत्या आहेत.