Video: ‘सिनेमा वाल्या बाबुं’चा शिकवण्याचा अनोखा मार्ग, दुचाकीवर TV लावून गरीब मुलांना देतात ‘क्लास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोरीया जिल्ह्यात राहणारे शिक्षक अशोक लोधी यांनी मुलांना शिकवण्याचा अनोखा अविष्कार शोधला आहे. ज्यामुळे ते आता ‘सिनेमा वाले बाबू’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. मुलांना शिकवण्याच्या या सर्जनशील पद्धतीने अशोक लोधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोरोना कालावधीत मुलांना शिकवण्यासाठी अनेक अनोख्या पद्धती अवलंबल्या गेल्या आहेत, त्यात सर्वात लोकप्रिय ऑनलाइन क्लासेस आहेत. परंतु दुर्गम भागात अनेक ठिकाणी या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वत्र ऑनलाईन क्लासेस दिले जाऊ शकत नाहीत. यामुळे सिनेमा वाल्या बाबूंच्या क्लासेसचे खूप कौतुक होत आहे.

जेव्हा अशोक यांना या शिकवण्याच्या विशेष शैलीविषयी विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की प्रत्येक मुलासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि लॉकडाऊनमध्ये शाळा बंद पडल्यामुळे कोणत्याही मुलाचे नुकसान होऊ नये. या सकारात्मक विचारसरणीने त्यांना मुलांना शिकवण्याचा हा अभिनव मार्ग सापडला.

कोणताही अतिरिक्त खर्च केला नाही
अशोक यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूस एक टीव्ही लावला, त्यासोबत माइक व स्पीकर्स जोडले आणि मुलांना मोहल्ला क्लासेस देण्यासाठी बाहेर पडले. त्यांचे म्हणणे आहे की या नाविन्यपूर्ण कल्पनेसाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले नाहीत आणि शाळेतल्याच गोष्टी वापरुन ते मुलांना टीव्हीवर क्लासेस देत आहेत. मुलेही या मजेदार पद्धतीने अभ्यासाचा आनंद घेत आहेत. सिनेमा वाल्या बाबूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.