शेंडा-बुडका नसलेला खासदार होऊन दिल्लीत काय करणार ? : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धैर्यशील त्यांच्या प्रचारसाठी आज इचलकरंजी येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘कसलाही शेंडा-बुडका नाही, आकार-उकार नाही, असा एकटा खासदार दिल्लीत जाऊन काय करणार ? असा सवाल उपस्थित करीत राजु शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली.

हातकणंगले मतदार संघ शुद्ध करा

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ज्याला स्वत:चा विचार नाही, पक्ष नाही, कसलाही शेंडा-बुडका नाही, आकार-उकार नाही, असा एकटा खासदार दिल्लीत जाऊन काय करणार ? शेतकर्‍यांचा स्वयंघोषित नेता म्हणवणारा हा खासदार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मागे किती उभा राहिला, असा सवाल करत हा खासदार बदला आणि हातकणंगले मतदार संघ शुद्ध करा, साफ करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी इचलकरंजीत केले.

आम्ही आंदोलनं करून कोणता कारखाना बंद पाडला नाही

आंदोलनाच्या नावाखाली कारखाने बंद पाडण्याची करंटीवृत्ती शिवसेनेची नाही.असे ठाकरे म्हणाले, कारखाने बंद पाडून रोजगार घटवण्यापेक्षा किती रोजगार वाढले, हे आम्ही पाहतो. मात्र, हा स्वयंघोषित शेतकरी नेता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मागे किती उभा राहिला, असा सवालही त्यांनी खा. शेट्टी यांना केला. मराठवाडा, विदर्भात विचित्र परिस्थिती आहे, पाण्याची भीषण टंचाई आहे. शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. मुला-मुलींचे लग्‍न होत नाही, अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू केलेल्या सामूहिक विवाह योजनेतून अशा मुला-मुलींचे विवाह करून दिले जात आहेत. त्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी शिवसेना मदत करत आहे, असे कोणत्या शेतकरी नेत्याने काही केले नाही. असे ठाकरे म्हणाले.

वस्त्रनगरीला पुन्हा वैभव मिळवून द्यायचे आहे

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विद्यमान खासदारांनी विकासाचे काय योगदान दिले. पंचगंगेचे काय झाले, ती कधी शुद्ध होणार? पंचगंगा शुद्ध होईल, आधी तुम्ही मतदार संघ साफ करा, खासदार बदला, सर्व प्रश्‍न सुटल्याखेरीज राहणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचाही प्रश्‍न आहे. अनेक कामगार उद्ध्वस्त झाले, त्यांच्या डोळ्यात आसू आहेत ते पुसायचे आहेत, त्यांच्या डोळ्यात पुन्हा हसू बघायचे, याकरिता या वस्त्रनगरीला पुन्हा वैभव मिळवून द्यायचे आहे, राज्यालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा, अशी ही वस्त्रोद्योगनगरी व्हावी याकरिता पोटतिडकीने प्रश्‍न मांडणार्‍या धैर्यशीलसारख्या तरुणाला लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, वृषभ जैन, विकास देशमुख, शिवाजी माळी आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आ. नीलम गोर्‍हे, आ. उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, सरचिटणीस मिलिंद नार्वेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, रजनीताई मगदूम, सुरेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते.