Exit Poll मुळे देशात ‘बोगस’ लाट निर्माण झाली : मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था – एक्झिट पोलने दिलेल्या निकालाच्या अंदाजावरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. एक्झिट पोलच्या या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या देखील मागे राहिल्या नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी ट्विटरवरून यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना एक्झिट पोलच्या आकडेवारीविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

मुफ्ती यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे ठोस पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून अजूनही शंकांचे निरसन करण्यात आलेले नाही. हे सगळे चालू असतानाच आता एक्झिट पोलची संशयास्पद आकडेवारी समोर आली आहे. परिणामी देशात एकप्रकारची खोटी लाट निर्माण झाली आहे. यावरून आणखी एका बालाकोटची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसतंय, असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये ११ एप्रिल ते ६ मे या कालावधीत मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) जम्मू काश्मीरच्या सहापैकी एकाही मतदारसंघात विजय मिळणार नाही. तर भाजपला जम्मूतील दोन लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल. लडाखमध्ये काँग्रेस आणि उर्वरित तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यापैकी बहुतांशी एक्झिट पोलनी भाजपप्रणित एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like