मेलानिया ट्रम्पच्या ‘हैप्पीनेस क्लास’ भेटीबाबत अमेरिकन दूतावासाचा मोठा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – दिल्ली सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सरकारी शाळेतील ‘हैप्पीनेस क्लास’ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप भेट देणार आहे. या भेटी दरम्यान त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठीच्या यादीतून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची नावे हटविण्यात आली आहे.

त्यावरुन वाद निर्माण झाला असून मोदी सरकारने जाणीवपूर्वक त्यांची नावे वगळल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर अमेरिकन दूतावासाने खुलासा केला आहे की, केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या उपस्थितीला अमेरिकेची कोणतीही हरकत नाही. या कामाबाबत त्यांची अमेरिका प्रशंसाच करते. मात्र, हा काही राजकीय समारंभ नाही. त्यामुळे शिक्षण, स्कुल आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष केंद्रीत करणे चांगले ठरेल.

दिल्ली निवडणुकीनंतर आपने आपले धोरण पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना या भेटीदरम्यान डावलले असले तरी त्यावर आपने कोणतीही विरोधी प्रतिक्रिया दिलेली नाही. राजकारणावर आता काही बोलायचे नाही. केवळ लोकांच्या प्रश्नांवरच उत्तरे द्यायची अशा सूचना केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर दिल्ली सरकारच्या या कामगिरीची दखल घेतली जात असतानाही त्याचे श्रेय आप ला व केजरीवाल यांना मिळू नये, यासाठी त्यांचे नाव वगळण्यात आले. तरीही आपने त्यावर विरोधी भूमिका घेतली नाही.