जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग २७ लढाऊ विमान कोसळलं

जोधपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग- २७ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. आज सकाळी नेहमीच्या सरावादरम्यान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते मोकळ्या जागेत कोसळले. विमानाचा पायलट बचावला असून तो सुखरुप असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच विमान कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोही जिल्ह्यातल्या शिवगंज येथे हवाई दलाचं विमान कोसळलं. वायुसेनेच्या मिग- २७ लढाऊ विमान एका रुटीन मिशनदरम्यान कोसळलं आहे. पायलटने पॅराशूटच्या माध्यमातून बाहेर उडी घेतल्याने तो सुखरुप बचावला आहे. घटनास्थळावर वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरु आहे.

गेल्या वर्षभरात मिग-२७ हे विमान कोसळल्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये राजस्थानमधील जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग-२३ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली होती.