Coronavirus : ‘या’ देशात लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातायेत 91 हजार रूपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे वाईट प्रकारे सामना करत असलेल्या अमेरिकेत सरकारने मदतीसाठी लोकांच्या खात्यात ९१-९१ हजार रुपये (१२०० डॉलर्स) ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील कोट्यवधी लोकांना बुधवारपासून हे पैसे मिळणार असून या मदतीला युनिव्हर्सल इन्कम पेमेंट असे म्हटले जाते.
२७ मार्च रोजी ट्रम्प यांनी २.२ ट्रिलियन डॉलरच्या कोरोना व्हायरस प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. ज्या लोकांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे पैसे ट्रान्सफर होऊ शकणार नाही त्यांना सरकार पोस्टद्वारे चेक पाठवेल. सरकार एक नवीन वेबसाइट देखील तयार करू शकते जिथे लोक त्यांच्या बँक खात्याचा तपशील देऊ शकतात.
अमेरिकेत बेरोजगारांची संख्या ६८ लाख झाली असून कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात आणखी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात CARES Act लागू केला होता. याअंतर्गत जे अमेरिकन एका वर्षात ५७ लाख रुपयांपेक्षा कमी कमवतात, त्यांना ९१,४११ रुपये दिले जातील.
५७ लाखाहून अधिक आणि वार्षिक ७५.४ लाखांपेक्षा कमी उत्पन्न कमावणाऱ्या लोकांनाही अल्प प्रमाणात मदत मिळेल. ७५.४ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्यास मदत मिळणार नाही.
नागरिकांसोबतच अमेरिकेत राहणाऱ्या रहिवाशांना देखील मदत मिळणार आहे. पण व्हिजावर राहणाऱ्या लोकांना मदत मिळणार नाही.
nymag.com च्या रिपोर्टनुसार, टॅक्स फाऊंडेशन नावाच्या संस्थेचा अंदाज आहे की, अमेरिकेत कर भरणाऱ्या ९३.६ टक्के लोकांना १२०० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी पैसे मिळतील. अमेरिकन सरकारमधील विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सचे म्हणणे आहे कि केवळ एकदा १२०० डॉलर्स देणे पुरेसे होणार नाही.