मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुण्यात खळबळजनक खुलासा, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजप (BJP) कुराण व गीता हे पवित्र ग्रंथ न वाचता फक्त ते कपाटात ठेवतात. भाजपने कुराण व गीता हे वाचून घ्यायला हवेत तरच त्यांना त्यातील सार कळेल. हे ग्रंथ न वाचता वर्तन करतात म्हणून देशात दंगली घडतात, असा खळबळजनक खुलासा राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. पुण्यातील कोंढवा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांना गीता आणि कुराण हे दोन्ही पवित्र ग्रंथ देण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, आमदार चेतन तुपे, रशीद शेख, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. सत्तार पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांवर अन्याय केला असल्याचा आरोप विरोधक करत होते. यामध्ये काहीही तथ्य नाही. विरोधक मुख्यमंत्र्याविषयी गैरसमज पसरवत आहेत. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्या तुलनेत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. हे सर्व अल्लाताला व राज्याच्या आरोग्य यंत्रणेमुळे शक्य झाले.

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधताना सत्तार म्हणाले, दानवे यांना पाडल्याशिवाय मी टोपी काढणार नाही. विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी धोका दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.

औरंगाबादच्या नामांतरावर अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. आता तर मी छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवणाऱ्या पक्षात आलो आहे. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी काही लोकं पुड्या सोडत आहेत. यामध्ये तथ्य नाही. अजंठा वेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होत आहे. मी पुन्हा येईल म्हणणारे काही पुन्हा आलेच नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.