‘माझ्या आत्महत्येला DIG निशिकांत मोरे जबाबदार असतील’, चिठ्ठी लिहून पिडीत तरूणी ‘बेपत्ता’, सर्वत्र खळबळ

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथे एमटी विभागात डीआयजी पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर अश्लील वर्तन केल्यामुळे 26 डिसेंबर 2019 रोजी पोस्कोअंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार पीडित मुलगी सोमवारी (दि.6) रात्री साडे अकरापासून राहत्या घरातून निघून गेली आहे. यावेळी या तरुणीने आपल्या खोलीमध्ये एक चिठ्ठी ठेवली आहे. डीआयजी निशिकांत मोरे यांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला असल्याचे या चिठ्ठीमध्ये लिहण्यात आले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका. माझ्या आत्महत्येला डीआयजी मोरे जबाबदार असलीत असे या चिठ्ठित लिहण्यात आले आहे.

या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटेनेचे गांभीर्य ओळखून तरुणीचा शोध सुरु केला आहे. तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधने यांनी दिली. दरम्यान निशिकांत मोरे यांनी या प्रकरणात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याचे समजतेय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/