मिशन धारावी : रविवारी ‘कोरोना’चे आढळले फक्त 5 नवे पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाइन – अरुंद रस्ते, गर्दी असलेली घरे, कमी खर्चात आरोग्य सेवा आणि कमकुवत स्वच्छता यामुळे अनेकांना वाटायचे की कोरोनामुळे भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी उध्वस्त होईल. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही. कारण मुंबई महापालिकेने अत्यंत मेहनतीने येथील कोरोनाचे समूळ उच्चाटन केले असून, महापालिकेने राबविलेल्या ‘मिशन धारावी’ चे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

‘मिशन धारावी’ अंतर्गत महापलिकेला रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळालं आहे. धारावीत रविवारी फक्त नवे ५ रुग्ण सापडले आहेत. धारावीत कोरोनाचे ५ तर दादर मध्ये ३१, माहीममध्ये १७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. धारावीत सध्या ८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून, दादर मध्ये ४५८ तर माहीम येथील २७२ रुग्णांवर वेगवगेळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापलिकतर्फे धडक उपाययोजना करत ‘मिशन धारावी’ ही योजना राबवत धारावीमधील हजारो रुग्णांची टेस्ट केल्याने हे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला. रुग्णांची तपासणी करुन, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना आयसोलेट करणे या उपाय योजना केल्यामुळे धारावीतील रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे प्रशासनाची चिंता थोडीफार का होऊन कमी झाली.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढतीच…

राज्यात रविवारी विक्रमी १२,२४८ कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ वर गेली. तर दिवसभरात ३९० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १७ हजार ७५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात १३,३४८ रुग्णांनी कोरोनवर मात केली असून, आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० जणांवर उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.