आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात मोट बांधा – अजित पवार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवी परिसरातील कार्यकर्त्यांशी नुकताच संवाद साधत काही कानमंत्र दिले. त्यामुळे तरुण कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. मुख्यत्वे करून अजित पवार यांनी आवर्जून नव्याने पुढे येत असलेले कार्यकर्ते श्याम जगताप यांची आवर्जून विचारपूस करीत रात्रीचे भोजनही त्यांच्या घरी घेतले. या भोजनावेळी पवार यांनी श्याम जगताप यांना भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा कानमंत्र दिला. तसेच ‘मी तुमच्या पाठीशी आहे…’, असेही सांगितले.

विकासकामे करूनही महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव अजित पवार अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते पुढे आणण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून रात्रीचे भोजन श्याम जगताप या कार्यकर्त्याच्या घरी केले. गत महापालिका निवडणुकीत श्याम जगताप यांनी आपले मामा व भाजपचे विद्यमान नगरसेवक शशिकांत कदम यांना जोरदार टक्कर दिली. यामध्ये जगताप यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी घेतलेले मताधिक्य नागरीकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार जगताप यांच्या होम पिचवर अशा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीच श्याम यांच्या घरी डिनर डिप्लोमसी केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. जेवणानंतर श्याम यांनी त्यांच्या जनावरांचा गोठाही अजित पवार यांना दाखविला. पवार यांनी त्यांच्या खिल्लारी बैलजोडीही पाहणी केली. श्याम जगताप यांच्याबरोबरच तानाजी जवळकर, तृप्ती जवळकर, अमरसिंग आदियाल, हुसेन मुलानी यांच्याशीही अजित पवार यांनी मनमोकळी चर्चा केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिवाचे रान करा. डगमगून जाऊ नका. काही अडचण आल्यास आपापसात चर्चा करा. प्रत्येक मतदान केंद्रावर येत्या 30 जूनच्या आत स्थानिक कार्यकर्ते नेमा. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करता येईल.

अपयश मिळाले म्हणून खचू नका, चुका दुरुस्त करून अंग झटकून, तडफेने कामाला लागा, असा कानमंत्रही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपल्या कार्यपद्धतीत बदलाच्या सूचनाही दिल्या. सतत अपडेट राहा. प्रत्येक नागरीकाच्या अडचणी समजावून घ्या आणि त्या सोडवा.