‘फडणवीस आणि राज्यपालांचं आधीच ठरलयं’, ‘या’ मंत्र्याचा ‘गौप्यस्फोट’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाठवली जाणारी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे बाजूला ठेवणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं आहे असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित 12 जागा भरावयाच्या आहेत. या जागांवरील उमेदवार हे विविध क्षेत्रातील असावेत असा निकष आहे. ते तसं नसल्यास राज्यपाल ती नावे नाकरू शकतात. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारनं अत्यंत काळजीपूर्वक नावं सुचवण्याचं ठरवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या सांत्वनासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) वारणा येथे गेले होते. तिथं कोरे यांच्याशी बोलताना पाटील यांनी हे विधान केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

मुश्रीफ म्हणाले, राज्यपालांचा राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू आहे. राज्य सरकारच्या अनेक अध्यादेशांवर राज्यपाल वेळेवर सह्या करत नाहीत. संविधानाच्या पलीकडे जाऊन ते राजकीय निर्णय घेत आहेत असा गंभीर आपरोपही मुश्रीफ यांनी यावेळी केला.

काँग्रेस नेत्यांना सुनावलं

मुश्रीफ असंही म्हणाले, सरकारमध्ये असूननही काँग्रेसचे काही नेते सतत नाराजी व्यक्त करतात. त्यामुळं भाजपला टीका करण्याची आयती संधी मिळते. यापुढं काँग्रेस नेत्यांनी टीका करताना भान ठेवावं, तारतम्य बाळगावं असा सल्लाही त्यांनी दिला.