राज ठाकरे पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’, 4 मार्चला नाशिकच्या दौर्‍यावर; शिवसेनेला धक्का अन् भाजपला साथ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. आत्तापासूनच सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून थंड असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा गती घेण्यास सुरुवात केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेही पुन्हा सक्रिय झाले असून येत्या ४ मार्चला ते नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका विवाह समारंभाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहे भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे. त्याचबरोबर निवडक पदाधिकाऱ्यांशीच राज ठाकरे चर्चा करणार असल्याचे समजते.

भाजपप्रमाणेच आता मनसेमध्येही इतर पक्षांच्या नेत्यांची इनकमिंग सुरु झाली आहे. नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील, अशी चर्चा होत आहे.

दरम्यान, स्थायी समितीत भाजप आणि शिवसेना यांचे समसमान संख्याबळ आहे. भाजप आठ तर विरोधकांपैकी शिवसेनेचे पाच तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे एकेक सदस्य म्हणजे आठ सदस्य आहेत. मनसेने महापौर निवडणुकीत भाजपाला साथ दिल्याने आताही मनसेचे सलीम शेख हे भाजपाबरोबरच जातील असे मानले जात आहे, त्यामुळे मनसे किंगमेकर मानली जात आहे. त्यामुळे भाजापाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने जोरदार झटका मिळणार असल्याची चर्चा आहे. मनसेची भाजपबरोबर मैत्रीचे नाते आहेच, परंतु महापालिका निवडणूकीनंतर ते अधिक घट्ट होऊ शकते.

भाजपची नाशिकमध्ये सत्ता आल्यानंतर महापालिकेतही सत्ता आली. हे सर्व राज्यातील सत्तेचे फलीत होते. अशा सत्तेची फळे चखण्यासाठी सर्वच पक्षातील आयाराम भाजपमध्ये दाखल झाले होते. मनसेही मागे राहिली नाही. मात्र राज्यातील सत्तातरानंतर हीच फळे कडू लागणे स्वाभाविकच आहेत. त्यामुळे २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत ज्या प्रमाणे मनसेची एकेक करीत साथ सोडून गेले तसेच काहीसे भाजपाचे होईल असे मानले जात आहे. ते खरे ठरलेच तर महापालिकेच्या निवडणूकीत काहीही होऊ शकते.

नाशिक महापालिकेमधील स्थायी समितीतील पक्षनिहाय सदस्य –
भाजपा- गणेश गिते, रंजना भानसी, हिमगौरी आडके, योगेश तथा मुन्ना हिरे, प्रतिभा पवार, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर आणि मुकेश शहाणे
शिवसेना – सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडकेर, ज्योती खोले, केशव पेारजे, रत्नमाला राणे
मनसे – सलीम शेख
राष्ट्रवादी – समीना मेमन
काँग्रेस – राहुल दिवे