‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय खोपकरांचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने इशारा दिला आहे. हलगर्जीपणामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे.

‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील 27 कलाकार व क्रू मेंबर्संना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे नधन झाले. राज्य सरकारने कोविड प्रोटोकॉलचे पालन करून शूटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती. दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वतोपरी पालन करणे, ही वैयक्तिक जबाबदारी आहे. याचे भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायला हवे. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर ‘मनचिसे’ मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असेही खोपकरांनी स्पष्ट केले आहे.