भाजपाकडून मनसेला मोठा धक्का, कल्याण-डोंबिवलीच्या मनपा निवडणूकीत बसणार फटका

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळतेय. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेला मंगळवारी दुसरा धक्का बसलाय. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. मंदार हळबे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत, असे समजतंय.

सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपने मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलंय. मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत, असं समजतंय. मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेेत. तर, मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना दिली होती, तेव्हा 37 हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला.

मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेही होते. सोमवारी शिवसेनेने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सागर जेधे यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला होता. त्यात मंगळवारी लगेच मंदार हळबे यांचा भाजप प्रवेश झाल्याने मनसेला डोंबिवलीमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.

राजेश कदम यांची शिवसेनेत वापसी
कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील, दीपक भोसले आदींनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. कदम हे पूर्वी शिवसेना पक्षात होते. मनसेची स्थापना झाल्यापासून ते संस्थापक-सदस्य होते. 2009 मध्ये त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. विविध कल्पक आंदोलने करून महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे, अशीच कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा कार्यकर्ता अशी कदम यांची ओळख होती. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात घेऊन मनसेचा मोहरा हिरावून घेतलाय. आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही मनसेला मोठा राजकीय धक्का दिलाय.