वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणात राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयात आज (शनिवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर झाले. न्यायालयाने 15 हजार रुपये जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका केली आहे. याप्रकरणी 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यांना पुढच्या तारखेला सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वकील राजन शिरोडकर यांनी पत्रकारांना दिली.

26 जानवेरी 2014 रोजी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत सांगितले होते. मात्र, राज ठाकरे न्यायालयात हजर न राहिल्याने वाशी न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले होते. अखेर आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, अभिजीत पानसे उपस्थित होते. न्यायालयाबाहेर मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी न्यायालय आवारात घोषणाबाजी करु नये, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

वाशी न्यायालयात 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. साक्षीदारांना समन्स काढले जाणार आहे. आम्ही आमची पुढची तयारी सुरु करणार असल्याचे वकील राजन शिरोडकर यांनी सांगितले.