Jio, Airtel, Vi च्या फ्री रिचार्जच्या लिंक क्लिक करु नका, ‘फ्री रिचार्ज’ पडेल महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. कोरोनामुळे अनेक लोक घरीच आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा फायदा घेऊन काही हॅकर्स लोकांची फसवणूक करत आहेत. सध्या सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपवर तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज मेसेज येत आहे. या मसेजवर विश्वास ठेवू नका. असे मेसेज ओपन केले तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. फ्री रिचार्जच्या भानगडीत पडला तर तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे मेसेज ओपन करु नका आणि त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करु नका.

सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर येत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, Jio, Airtel आणि Vi युजर्सला वर्क फ्रॉम होमसाठी तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज दिला जात आहे. या मेसेजमधून दावा केला जात आहे की, ही स्कीम सरकारकडून दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही चुकूनही हा मेसेज ओपन केला तर फ्री रिचार्ज तर मिळणार नाहीच शिवाय तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

काय आहे मेसेज ?

या व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून सरकारकडून Work from Home साठी 3 महिन्याचे रिचार्ज फ्री दिले जात आहे. जर तुम्ही Jio, Airtel, Vi चे सिम कार्ड वापरत असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. नोट – खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपला फ्री रिचार्ज करा….. कृपया लक्ष द्या, ही ऑफर केवळ 30 एप्रिल 2021 पर्यंत आहे.

या लिंक्सवर चुकूनही क्लिक करु नका

या मेसेज सोबत देण्यात आलेल्या myrecharge ची लिंक पूर्णपणे फेक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होते. यामध्ये Jio, Airtel आणि Vi रिचार्ज करण्यासाठी आपले ऑपरेटरची निवड करा, असे सांगितले जाते. त्यानंतर बँक डिटेल्स मागितले जाते. तसेच तुमची पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते.

ऑनलाइन शिक्षणासाठी देखील असाच मेसेज

एका मेसेजमध्ये COAI आणि PIB Fact Check ने ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सरकार अशा पद्धतीची कोणतीही ऑफर देत नाही. PIB Fact Check ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, एक #WhatsApp मेसेज मध्ये दावा केला आहे. सरकार 3 महिन्यासाठी 100 मिलियन युजर्संना फ्री इंटरनेट देत आहे. तुम्हाला जर असा मेसेज आला तर त्याला पुढे पाठवू नका. तसेच अशा मेसजला क्लिक देखील करु नका. असे मेसेज तातडीने डिलीट करा.