‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?’ या पोस्टरच्या माध्यमातून प्रश्न करणार्‍या 17 जणांना अटक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत लावलेल्या पोस्टरप्रकरणी एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच 17 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली? असा सवाल करणारे पोस्टर दिल्लीत विविध ठिकाणी लावले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीच्या पूर्व, उत्तर पूर्व, मध्य, उत्तर, रोहिणी आणि दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात पोस्टर लावले असून त्यावर मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली? असे लिहले असल्याची माहिती गुरुवारी रात्री दिल्ली पोलिसांना मिळाली होती. सदर पोस्टर कोणी छापले अन् कोणाच्या विनंतीवरून लावले याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. दरम्यान दिल्लीसह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची होणारी वाढ पाहता चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची 3,26,098 नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3,890 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.