व्यापार्‍याच्या मुलाचे 20 कोटीसाठी अपहरण करणार्‍या शहाबाज टोळीविरूध्द मोक्‍का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यापार्‍याच्या मुलाचे अपहरण करून 20 कोटी रूपयांची खंडणी मागणार्‍या शहाबाज फिरोज खान टोळीविरूध्द खडक पोलिसांनी मोक्‍का अंतर्गत कारवाई केली आहे. खान टोळीतील 6 जणांविरूध्द ही कारवाई करण्यात आल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.

शहाबाज फिरोज खान (28, रा. भवानी पेठ, पुणे), सुयश राजु वाघमारे (26), आरबाज फिरोज खान (27), फरदीन परवेज खान (19), साहिल अब्दुल शेख (23) आणि सुरज लक्ष्मण चव्हाण (29) यांच्यावर मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपहरणाच्या गुन्हयात आरोपींपैकी आरबाज, फरदीन, साहिल आणि सुरज यांना अटक झालेली आहे तर आरोपी शहाबाज आणि सुयश हे फरार आहेत. आरोपींनी भवानी पेठेतील एका व्यापार्‍याच्या मुलाचे दि. 6 ऑक्टोबर रोजी पुना कॉलेज येथुन अपहरण केले होते. आरोपींनी व्यापार्‍याकडे तब्बल 20 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी अपहरण प्रकरणाचा छडा लावुन व्यापार्‍याच्या मुलाची सुटका केली. त्यानंतर खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी टोळीविरूध्द मोक्‍का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी अप्पर आयुक्‍त रविंद्र सेनगावकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम आणि सह आयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी गुन्हेगारी टोळयांचा बिमोड करण्याचा आदेश सर्वच पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिलेला आहे. शहाबाज आणि त्याच्या इतर साथीदारांविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी महेश बारावकर, महेश कांबळे, दिपक मोघे यांनी टोळीविरूध्द मोक्‍काचा प्रस्ताव पाठविला होता. अपहरणाच्या गुन्हयातील फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.