उमेश काळे टोळीतील ९ जणांवर ‘मोक्का’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील पडवी सुपे घाटामध्ये गव्हाच्या ट्रकचे अपहरण करणाऱ्या उमेश काळे व त्याच्या टोळीतील ८ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.

यवत पोलीस ठाण्यामध्ये उमेश काळे टोळीवर २८ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एका ट्रकचालकाने फिर्याद दिली होती. उमेश काळे टोळीने फिर्यादी व त्यांचे सोबत असलेला ड्रायव्हर हे ट्रकने राजस्थान येथे ३१५ पोती गहू भरून तो राजस्थान-पुणे मार्गे गोवा राज्यात घेवुन जात असताना दिनांक २६ मार्च रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास पडवीजवळ असणाऱ्या सुपा घाटात ट्रकला वैगनआर कार आडवी मारून ट्रकमधील गहु तसेच दोन मोबाईल असे जबरदस्तीने काढुन घेवुन फिर्यादी व त्याचे बरोबर असणारा ड्रायव्हर असे दोघांनाही वॅगनआर कारमध्ये जबरदस्तीने बसवुन त्यांना डांबुन ठेवले होते.

या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे पोलीस पथक तसेच यवत पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक श्री.भाऊसाहेब पाटील, तपासी अंमलदार पो.उपनिरीक्षक लकडे, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस स्टाफ असे समांतर रित्या करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे पथकाने सदर गुन्हयामध्ये प्रथम सागर अंबादास चव्हाण (रा. मांडवे ता.माळशिरस जि.सोलापुर) यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने सदरचा गुन्हा हा आपले साथीदार उमेश मधुकर काळे (रा.राशीन ता.कर्जत जि.अहमदनगर), रेवणनाथ प्रभाकर जाधव (रा.वीट ता.करमाळा जि.सोलापुर), मंगेश ऊर्फ पप्पु राजेंद्र चव्हाण (रा. क-हावागज ता.बारामती), सुरज लक्ष्मण गाडे (रा.सावंतवाडी ता.बारामती जि.पुणे), शेखर सुभाष शिंदे (रा. सांगवी ता.बारामती जि.पुणे), सचिन महादेव गेजगे (रा. मांडवे .माळशिरस जि.सोलापुर), महेश मारूती पेड़कर (रा.फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापुर), अमोल कसबे (रा.देसाई इस्टेट जळोची बारामती), ज्ञानेश्वर कांबळे (रा.बारामती जि.पुणे) यांच्या साथीने केला असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्हयामधील आरोपी उमेश मधुकर काळे याने त्याच्या टोळीतील सदस्यांना बरोबर घेवुन संघटीतपणे स्वत:चे तसेच टोळीतील सदस्य यांचे आर्थिक प्राप्ती तसेच टोळीचे वर्चस्वाकरीता एकुण ८ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(४) हे कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव यवतचे पोलीस निरीक्षक यांनी अपर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या मार्फत तो पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पाठवला होता.

पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांनी सदरचा प्रस्ताव हा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक साो कोल्हापुर यांना पाठवल्यानंतर त्यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिली. यानंतर वरील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलमान्वये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असुन सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो.उपनिरीक्षक लकडे, पो.हवा बनकर ब.नं २२४, पो.हवा कदम व.नं २१४, पो.ना पोटे, पो.कॉ रासकर, पो.कॉ. गजरे यांचे पथकाने केली.