चिंताजनक ! यंदा ‘वळीव’ गायब ; मान्सूनही लांबणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा राज्यात उष्णतेचा कहर झाला असून राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वजण वळिवाच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र मान्सूनपूर्वी बरसणारा वळीव अद्याप गायब आहे. राज्यात १७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा २०-३० टक्के पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मेच्या तिसर्‍या आठवड्यात एक वळिवाच्या पावसाला सुरुवात होत असतो. मात्र या वर्षी मे महिना संपत आला तरी वळीव अद्याप बरसला नाही. तसेच दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी १७ जून उजाडेल. यंदा १९७२सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून मान्सूनपूर्वी होणारा वळीव नाही अशी माहिती हवामान विभागाचे अभ्यासक, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.

या कारणामुळे वळीव गायब –

उत्तरेकडून कोरडे वारे वाहू लागले आहेत . त्यामध्ये बाष्प नाही. तसेच कमाल तापमानही यंदा दरवर्षीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त आहे. त्यामुळे वार्‍यांमध्ये बाष्प, आर्द्रता नाही. वळीव होण्यासाठी कोणतीच अनुकूल स्थिती नसल्याने गायब आहे.