डास मानवी रक्त का पितात…कारण समजताच आश्चर्यचकित झाले शास्त्रज्ञ, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आपल्याला माहिती आहे का डास आपले रक्त का शोषतात ? रक्त पिण्याची सवय त्याला कशी लागली ? याचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलेले त्यामागचे कारण जाणून घेतल्यास आपण आश्चर्यचकित व्हाल. कारण जगाच्या सुरुवातीस डासांना रक्त पिण्याची सवय नव्हती. हा बदल हळू हळू झाला आहे. डास कोरड्या प्रदेशांमध्ये राहत होते त्यामुळे त्यांनी मानवांचे आणि इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा हवामान कोरडे असते आणि डासांना त्यांच्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही तेव्हा ते मानवाचे किंवा प्राण्यांचे रक्त शोषू लागतात.

न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आफ्रिकेच्या एडीस एजिप्टी (Aedes Aegypti) डासांचा अभ्यास केला. हे तेच डास आहेत ज्यामुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. यामुळेच डेंग्यू आणि पिवळा ताप येतो. न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आफ्रिकेच्या डासांमध्ये एडिस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. सर्व प्रजातींचे डास रक्त पीत नाहीत. इतर बर्‍याच गोष्टी खाऊन पिऊन ते जगतात.

प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे संशोधक नोआह रोज म्हणतात की वेगवेगळ्या प्रजातींच्या डासांच्या आहाराचा अभ्यास अद्याप कुणीही केलेला नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारान प्रदेशात 27 ठिकाणी एडीस एजिप्टी डासांची अंडी घेतली.

आम्ही या अंड्यांमधून डासांना निघू दिले. मग त्यांना मानव, अन्य जीव, गिनिपिग सारख्यांवर प्रयोगशाळेत बंद कपाटांमध्ये सोडले जेणेकरुन त्यांची रक्त पिण्याची पद्धत समजेल. एडिस एजिप्टी डासांच्या विविध प्रजातींच्या डासांचे खाणे-पिणे पूर्णपणे भिन्न असल्याचे दिसून आले. नोआह यांनी सांगितले की सर्व डास रक्त पितात हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. होते असे की जेथे जास्त कोरडे वातावरण किंवा उष्णता आहे, पाणी कमी आहे तेथे डासांना प्रजननासाठी ओलावा असणे आवश्यक आहे. परिणामी पाण्याची कमतरता भागविण्यासाठी डास मानवांचे व इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरुवात करतात.

डासांच्या आत हा बदल हजारो वर्षात आला आहे. एडीस एजिप्टी डासांची एक खास गोष्ट अशी होती की वाढत्या शहरांमुळे ते पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागले. मग त्यांना मानवी रक्त पिण्याची गरज भासली. परंतु, जेथे माणसे पाणी साठवतात, तिथे अ‍ॅनोफिलीस डास (मलेरिया पसरवणारे) ला कोणतीही समस्या उद्भवत नाही. ते आपले प्रजनन कूलर, भांडी आणि बेडसारख्या ठिकाणी करतात. परंतु पाण्याची कमतरता भासताच ते रक्त पिण्याकरिता मानवांवर किंवा इतर प्राण्यांवर त्वरित हल्ला करतात.