पुरंदर, भोर, वेल्हा मुळशी तालुक्यातून सातारा जिल्ह्यात कामगारांना कामावर जाण्यास मुभा ; कामगार वर्गातून सुप्रिया सुळे यांचे आभार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील अनेक कामगार सातारा जिल्ह्यातील शिरवळ-खंडाळा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात नोकरी करतात. लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदीमुळे हे कामगार कामावर जाऊ शकत नव्हते. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे कामगरांना कामावर जाण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे या समस्त कामगार वर्गातून सुळे यांचे आभार मानण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लागू झालेल्या टाळेबंदीत बारामती मतदार संघातील शेकडो नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समोर येत आहेत. मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, महाविद्यालयीन युवक आपल्या मूळ गावापासून नातेवाकांपासून अन्यत्र अडकून पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यांतील अनेकांना सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचता आले. चालू महिन्यात टाळेबंदी अंशतः शिथिल होऊन उद्योगधंदे सुरू झाले. कामगार आपापल्या कामावर पोहोचू लागले; मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करत असलेल्या कामगारांना जिल्हाबंदीचा फटका बसत आहे. परिणामी कामावर जाण्याची इच्छा असूनही अनेकजण अडकून पडले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ आणि खंडाळा औद्योगिक वसाहतीत भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर तालुक्यातील अनेक कामगार नोकऱ्या करतात. या कामगारांनाही जिल्हाबंदीची अडचण येत होती. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्याकडे अनेक कामगारांनी विचारणा करून मार्ग काढण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार शिवतारे यांनी ही बाब सुळे यांच्या लक्षात आणून दिली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनीही याबाबत सुप्रिया सुळे यांच्याकडे पुरंदर तालुक्यातील कामगारांच्या अडचणी मांडल्या होत्या. ही बाब लक्षात येताच सुळे यांनी लागलीच सातारा आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कामगारांच्या अडचणींंची दखल घेत पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या कामगारांना कामावर जाण्याची मोकळीक देण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने या कामगारांना काही अटींवर कामावर जाण्याची परवानगी दिली आहे. अशा रीतीने पाठपुरावा करून कामगारांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यास परवानगी मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी खा. सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहे.