इंदापूरात महावितरण कंपनीचा मनमानी ‘कारभार’ चव्हाटयावर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – विद्युत वितरण उपविभाग इंदापूर यांनी शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणारे नवीन विद्युत मोटर वीज जोड व ट्रान्सफार्मर कनेक्शन देण्याचे गेल्या एक ते दीड वर्षापासून बंद केले आहे. याबाबत कार्यालयीन संबधीत अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवुन, मागील पेंडन्सी पूर्ण होइपर्यंत नविन विद्युत कनेक्शन व ट्रान्सफार्मर मागणी अर्ज स्विकारू शकत नसल्याचे तोंडी सांगत आहेत. परंतु लेखी देण्यास नकार देत आहेत.

यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदील झाला आहे. या प्रकारामुळे इंदापूर विद्युत वितरण उपविभागाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर सर्वसामान्य शेतकरी पुरता वैतागला असुन येत्या आठ दिवसात नवीन विजजोडणी प्रक्रिया सुरू न झाल्यास विद्युत वितरण उपविभागाच्या विरोधात शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभे करणार असल्याची माहिती शेतकरी सुकाणु समितीचे पूणे जिल्हाध्यक्ष एड.श्रीकांत करे यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.

ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यात अनेक नवीन सुशिक्षित बेरोजगार युवक धाडसाने बँकांकडून कर्ज काढून शेती विकसित करू पाहत आहेत. अनेकांनी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन विहीर पाईपलाईन असा खर्च केला आहे. परंतु नवीन वीज जोडणी साठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातुन गेल्या एक ते दीड वर्षापासुन त्यांना नुसती उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. मागील पेंडन्सी पूर्ण होईपर्यंत आम्ही नवीन विद्युत कनेक्शन अर्ज घेऊ शकत नाही आणि ही प्रक्रिया आमच्या कार्यालयात वरूनच बंद आहे. अशा स्वरूपाची तोंडी उत्तरे मिळत आहेत. परंतु लेखी उत्तर मागीतल्यास त्यांचेकडून उडवा उडवीची उत्तरे देवुन टाळण्यात येत असल्याने अनेक सुशिक्षित युवकांची व शेतकऱ्यांचे कुचंबणा होत असुन विद्युत वितरण विभागाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सुर पसरत आहे.

देशात सर्वात मोठा रोजगार शेती क्षेत्र उपलब्ध करत असते आणि हा रोजगार पर्यावरण पूरक व निसर्गाशी एकरूप असलेला आहे. यामुळे फार कमी प्रमाणात प्रदूषण होते. परंतु वारंवार शेतीवर अन्याय आणि सापत्नभाव देण्याची वागणूक महावितरण कंपनीची आहे. खरं तर मागेल त्याला वीजजोड दिलं तर शेतकऱ्यांच्या एकूण देशाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. परंतु शेतीऐवजी उद्योगांना प्रायोरिटी दिल्याची दिसते. यातून शेतकऱ्यांच्या नवीन पिढीमध्ये एक नकारात्मक संदेश जात आहे. तरी महावितरण कंपनीने तात्काळ मागेल त्याला विजोड ही संकल्पना त्वरित राबवावी. अन्यथा लवकरच शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभारणार असल्याचे श्रीकांत करे यांनी सांगीतले.

याबाबत इंदापूर विद्युत उपविभाग कार्यकारी उपअभियंता गोफणे यांचेशी संपर्क साधला असता. ते रजेवर असुन त्यांचे जागी प्रभारी काम पाहणारे वालचंदनगर विद्युत उपविभाग उपकार्यकारी अभियंता सुळ यांनी याबाबत उत्तर देण्याचे टाळले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –