मुलायमसिंग यांचे आतापर्यंतचे मोदींविषयी मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशातील अनेक बडे पक्ष एकत्र आले आहेत. देशात पुन्हा मोदी सरकार येऊ नये अशी इच्छा विरोधकांकडून व्यक्त होत आहे. त्यातच नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले पाहिजेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी केले आहे. ते बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. मुलायमसिंग यांनी हे वक्तव्य केल्यानंतर तेथील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. त्यामुळे माझी एवढीच इच्छा आहे की, आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे मुलायमसिंग यांनी म्हटले. त्यावेळी सभागृहात उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. त्यावर नरेंद्र मोदींनीही हसत मुलायमसिंह यांना अनिवादन केले.

दरम्यान, मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कारण मोदी सरकारला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, बसपा, तृणमुल काँग्रेस, आप..,असे अनेक पक्ष एकत्र आले आहेत. त्यांच्याच गोटात बसून मुलायमसिंग यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी शेजारी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मागे बसल्या होत्या. तेव्हा मुलायमसिंह यांनी हे वक्तव्य केले. ते उपरोधात्मक होते की अजून काही हे स्पष्ट नाही. मात्र त्यांनी असं का म्हटलं हा प्रश्न सर्वांना पडला आहे.