Mumbai : नागरी समस्या-अडचणी सोडविण्यासाठी भाजप सरसावले, हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू करणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चौदा महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. भाजपने तर हि निवडणूक जिकंण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मुंबईकरांना सतत भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपने सेवासेतू वॉररूमची निर्मिती केली आहे. समस्या मांडण्यासाठी लवकरच हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येणार आहे.

या सेवासेतू वॉररूमचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत झाले. या वॉररुमच्या हेल्पलाईनवर मुंबईकर आपल्या वॉटर-मीटर-गटर सह कोणत्याही नागरी समस्या मांडू शकतील.

त्या समस्या कोणत्या ठिकाणच्या आहेत.तसेच शासनाच्या कोणत्या खात्याशी संबंधित आहेत, त्यानुसार भाजप कार्यकर्ते त्या समस्या त्या अधिकाऱ्याकडे नेऊन तेथे मांडतील आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतील. त्यासाठी भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधीदेखील विचारविनिमय आणि साह्य करतील, अशी ही योजना आहे.

वॉररूममध्ये २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
दादरच्या भाजपच्या शहर मुख्यालयातील या वॉररूममध्ये वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. येथे नागरिक कोणत्या प्रकारच्या तक्रारी करतात ते पाहून नंतर या कामाची व्याप्ती वाढविली जाईल, जरुर तर हे कार्यालय 24 तासही सुरु ठेवले जाईल, असे कार्यालयप्रमुख प्रतीक कर्पे म्हणाले

फडणवीसांकडून कौतूक
नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. सामान्यलोक तसेच लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर नष्ट करण्याचे काम ही योजना करेल, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कल्पनेचे कौतूक केले.