Coronavirus : भाजपाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट, ‘कोरोना’ला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी ५४ दिवस लागू करण्यात आलेले लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलं आहे. मात्र, राज्यातील वाढत्या कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला असून, सोमवारी रात्रीपर्यंत संसर्गितांचा आकडा ३५ हजारांपार गेला आहे. राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास राज्यसरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला. तसेच, कोरोना संसर्गाला रोखण्यास अपयशी झालेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुंबई मधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली असून राज्यसरकार ते हाताळण्यास निष्क्रिय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपा मंगळावरपासून राज्यभर “महाराष्ट्र बचाओ” आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दिला.

राज्यातील सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देणार आहे. तर शुक्रवारी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या निष्क्रियतेपणाचा निषेध करतील. असं भाजपाच्यावतीने सांगण्यात आलं.