आत्महत्या करण्यासाठी तिनं इन्स्टावर टाकली पोस्ट अन् पुढं झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालमधील एका तरुणीने आत्महत्या करण्याआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. ती पोस्ट मुंबई सायबर विभागाचे महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी तरुणीचा पत्ता शोधून काढून तिचा जीव वाचविला आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणार्‍या मुलीचा जीव वाचला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग चोवीस तास कोविड -19 संदर्भात सोशल मीडियावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इन्स्टाग्रामवर एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली. ही बाब विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना कळताच, त्यांनी तातडीने सायबर सेल मधील तज्ज्ञांकडून संबंधित मुलीच्या अकाऊंटचे डिटेल्स तात्काळ शोधून काढले. ते पश्चिम बंगालमधील बराकपूर येथील आढळून आले. त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांक देऊन संभाव्य घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

बराकपूर पोलिसांनी तत्परतेने त्या मुलीचा शोध घेतला आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. संपर्कासाठी थोडा जरी अवधी लागला असता तरी मुलीचा जीव जाण्याची दुर्घटना घडली असती. पण सुदैवाने योग्यवेळी संपर्क झाल्यामुळे मुलीचा जीव वाचला आहे.