‘कोरोना’मुळे वसईतील प्रसिद्ध डॉक्टर असलेल्या माजी नगरसेवकाचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचे निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. पाटील हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी कायम तत्पर म्हणून परिचित होते. मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक झाल्याचे आढळत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

नालासोपारामधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डॉ. हेमंत पाटील यांची प्राणज्योत मालवली. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर डॉ. हेमंत पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून ते अत्यवस्थ होते, असे वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले.

डॉ. हेमंत पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक होते. हितेंद्र ठाकूर यांनी स्वत: डॉ. हेमंत पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. डॉ. हेमंत पाटील यांनी नगरसेवक आणि सभापतीपदही सांभाळले होते. गेल्या 10 वर्षांपासून वसई-विरार पालिका व नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी ते स्वतःहून सांभाळत होते.

वसई-विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. येथे कोरोनाबाधितांची संख्या 7613 पोहोचली असून त्यापैकी 5452 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 155 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 2006 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

पालघरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पालघर जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल 390 नवे रुग्ण आढळले. तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आकडा आता 9 हजारांहून जास्त झाला आहे, त्यामुळे पालघरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.