मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची 3 प्रकरणांमध्ये अ‍ॅन्टी करप्शनकडून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रार प्रकरणी आता लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे, अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जलाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे परमबीर सिंग यांना पुन्हा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करुन प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे, अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जलाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या विरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करुन कोट्यावधी रुपये कमावल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आले होते. पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिररित्या आदेश दिल्याचा आरोप केला होता. तसेच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराव घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.

पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्त यांसह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरुन सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परमबीर सिंग यांच्या विरोधातील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा वर्ग झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे. ही प्राथमीक चौकशी आहे. यामध्ये सर्व साक्षीदार आणि तक्रारदारांचा जबाब नोंदवला जात असतो. तर दुसरीकडे क्रिकेट बुकी सोनू जलाल याने देखील परमबीर यांच्यावर आरोप केले आहेत. सोनू जलाल याने देखील गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून तक्रार केली आहे.