CM ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक ?, मेट्रो 3 चे कारशेड प्रस्तावित जागेत ?, चाचपणी सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो 3 च्या (Mumbai Metro) कारशेड कामाला मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्टे ऑर्डर’ दिली आहे. यामुळे हा वाद दिर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील (Bandra-kurla complex) बुलेट ट्रेनसाठीच्या (bullet train) प्रस्तावित जागेवर उभारता येते का ? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचे समजतंय.

मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील जागेबाबत आपला निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.17) एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मेट्रो 3 च्या कारशेडचं काम तात्पुरतं मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेटसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलवलं जाऊ शकतं का याची चाचपणी करण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. यामुळे हा पर्याय योग्य ठरु शकतो हे सरकारकडून पडताळून पाहिले जात आहे.

मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, राज्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यानंतर कारशेड कांजूरमार्गला होणार असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने कडाडून टीका केली. तसेच हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने कांजूर येथील कामाला स्थगिती दिली.

केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

मुंबई मेट्रो तीन कारशेडच्या जागेवरुन भाजप आणि महाविकास आघाडीत राजकारण रंगताना पाहायला मिळालं आहे. अशात बुलेट ट्रेन हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्री प्रोजेक्ट. मात्र, बुलेटसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता ती जागा केंद्राला दिली जावी की मेट्रो तीनच्या कारशेडसाठी वापरली जावी याबाबत विचार सुरु असल्याने पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.