कंटनेर उलटल्याने मुंबई – नाशिक वाहतूक विस्कळीत

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई – नाशिक महामार्गावरील भिवंडी राजनोली जंक्शनजवळ एका कंटेनरचे स्टेरिंग लॉक झाल्याने तो उलटून महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनर उलटल्याने त्यातील पांढरी पावडर संपूर्ण महामार्गावर पसरल्याने त्यामुळे वाहने घसरु नयेत, यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

केमिकल घेऊन जाणारा हा कंटेनर भिवंडी राजनोली जंक्शनजवळील अवली फाटकाजवळ आला असताना त्याचे अचानक स्टेरिंग लॉक झाले. त्यामुळे कंटेनर उलटला. त्यातील पांढरे केमिकल संपूर्ण रस्त्यावर पसरले. ही माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक पाईपलाईन रस्त्याने वळविली. तर मुंबईहून येणारी अवजड वाहने ठाण्यातील खारे गाव टोल नाक्यापासून वळवून मुंब्रा शिळफाटा येथून कल्याणच्या दिशेने रवाना केली.
दरम्यान, महामार्ग पोलिसांनी दोन क्रेन बोलावून हा कंटेनर तेथील जागेवरुन हलविला आहे. रस्त्यावर पसरलेली पावडर हटविण्याचे काम सुरु असून वाहतूक हळू हळू सुरु करण्यात आली आहे.