CM उद्धव ठाकरे यांच्यावर घसरले माजी नेव्ही ऑफिसर, म्हणाले – ‘कायदा आणि सुव्यवस्था पाहू शकत नाहीत तर राजीनामा द्यावा’

मुंबई : शिवसैनिकांच्या हल्ल्यात जखमी झालेले रिटायर्ड नेव्ही ऑफिसर मदन शर्मा यांना आज हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, जर सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळू शकत नसेल तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे.

ते म्हणाले की, माझ्या बाबतीत खुप वाईट घडले. मी एक सिनियर सिटिझन आहे. शिवसैनिकांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते, परंतु चर्चा न करताच त्यांनी मरहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण केल्यानंतर अटक करण्यासाठी माझ्या घरी पोलीस पाठवण्यात आले. पोलिसांवर राजकीय दबाव होता.

त्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माझी विचारपूस केली, मी त्यांना घटनेबाबत सर्व सांगितले. संरक्षण मंत्र्यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मी संरक्षणाची मागणी केली आहे. चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री म्हणाले की, माजी सैनिकावर अशाप्रकारचा हल्ला संतापजनक आहे आणि हे कधीही सहन केले जाणार नाही.

रिटायर्ड नेव्ही ऑफिसर शर्मा यांनी म्हटले की, कंगना राणावतच्या घटनेने मी निराश झालो होतो. व्हॉट्सअप ग्रुप ज्यामध्ये मी छायाचित्र शेयर केले होते, त्यामध्ये आमदार आणि खासदार आहे. कुणालाही आक्षेप नव्हता. जर त्यांना आक्षेप होता तर माझ्यासोबत बोलायला पाहिजे होते.

उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांच्याकडे मोठ्यांशी कसे वागावे याचे संस्कार नाहीत. बाळासाहेब महान कार्टुनिस्ट होते. त्यांच्या कार्टुनमधून गोष्टी बाहेर येत असत. या कार्टुनला बक्षीस दिले पाहिजे.

माजी अधिकारी मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टुन फॉरवर्ड केले होते. यावरून नाराज झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. मात्र, नंतर सहा लोकांना अटक करण्यात आली, आणि शनिवारी दुपारपर्यंत सर्वांना पाच हजार रूपयांच्या जामीनावर सोडण्यात आले.