राज्यातील मंदिरे दोन दिवसांत उघडा, भाजपने दिला ‘हा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असताना देखील अद्याप धार्मिक स्थळे बंद आहे. राज्य सरकारच्या या निर्णया विरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यात आज घंटानाद आंदोलन करत सरकारकडे राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली. भाजपने राज्यातील आघाडी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली असून दोन दिवसांत मंदिरे उघडली नाही तर भाजपकडून राज्यातील मंदिरे उघडली जातील असा इशारा देण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार जागे झाले तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील, असा इशारा आज (शनिवार) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारला दिला आहे. सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद आज राज्यभरात केला जात असल्याचे, प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. मागाठाणे येथील अशोकवन परिसरातील हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनानंतर दरेकर बोलत होते.

आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा

केंद्राने संपूर्ण देशभर मंदिरे, मशिदी, चर्च अशी प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरुही झाली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे आपल्या धर्माच्या, हिदुत्वाच्या किंवा या सर्व प्रक्रियेच्या विरोधात आहे असे दिसते. एकीकडे दारुची दुकाने सुरु होत आहेत, मॉल सुरु होत आहेत परंतु आमची श्रद्धास्थान असलेली दैवतं, त्यांची मंदिरे सुरु होत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत त्यांनी मंदिर प्रश्नी आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

सरकारचे कान उघडे असतील तर..

उद्धवा दार उघड, आता तरी जागा हो, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभर घेतली आहे. सरकारचे कान उघडे असतील तर आजच्या घंटानादाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय ते घेतली. पण जर दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भाजप स्वत: मंदिरे उघडी करेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच सोशल डिस्टन्सिंगची जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबत मंदिरांना सूचना देऊ, भक्तगण काळजी घेतील, असेही दरेकर यांनी पुढे नमूद केले.