कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा अखेर मुंबई पोलिसांना मिळाला ताबा, सोमवारी मुंबईत घेऊन येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षभरापासून कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. कर्नाटक न्यायालयाने मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी शनिवारी (दि. 20) परवानगी दिली. सोमवारी (दि. 22) मुंबई पोलीस रवी पुजारीला कर्नाटकातून घेवून येणार आहेत.

रवी पुजारीवर संपूर्ण भारतात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी धमकावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, संघटीत गुन्हेगारी करणे यांसारखे अडीचशे पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. अँथोनी फर्नांडिस हे नाव बदलून रवी पुजारी गेली 8-10 वर्षे आफ्रिकेतील सेनेगल मधील डकारमध्ये राहत होता. डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी ओळख रवी पुजारीची झाली होती. गेल्या वर्षी अटक झाल्यावर फरार झालेला रवी पुजारी पुन्हा आपली संपत्ती आणि परिवाराला घेऊन जाण्यास डकारमध्ये आला होता. पण हा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा सापळा होता. ज्यात रवी पुजारी सहज अडकला. याआधी रवी पुजारीच्यावतीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सेनेगल सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने पुजारीची चारही बाजूने कोंडी झाली होती.