खुशखबर ! ‘या’ पोलिसांना मिळणार सरकारी दरानं मालकीचं घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांना शासकीय दरानं स्वत:च्या मालकीचं घर आणि गिरणी कामगारांना 500 चौरस फुटांचं घर देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबत काही अंशी निर्णय झालेला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली. पोलिसांना आणि गिरणी कामगारांना मालकीची घरं मिळावीत यासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील पोलिसांना शासकीय भावानं स्वत:च्या मालकीचं घर मिळावं, एन. टी. सी. आणि गिरण्यांच्या जागेवर राहत असलेल्या गिरणी कामगारांना 50 चौरस फुटांच घर मिळावं तसचं, नायगाव येथील बी. डी. डी. चाळीतील रहिवाश्यांना इतर कुठेही स्थलांतरीत करु नये या मागणीसाठी कोळंबकर यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणाची जितेंद्र आव्हाड यानी दखल घेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आश्वासन दिल्यानंतर कालिदास कोळंबकर यांनी उपोषण सोडले. कोळंबकर हे गेल्या अनेक दिवसांपासून या मागण्यांचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासह गृहनिर्माण विभागाची संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.